कै. श्री. भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिलेले आहे. 21 डिसेंबर 1903 रोजी त्यांचा जन्म तासगाव (जिल्हा सांगली) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सौहार्दता ही त्यांची ओळख होती. त्यांच्यात पहिल्यापासूनच उद्योजकतेची तीव्र इच्छा होती व त्यामुळे ते प्रथम सांगली, तसेच नंतर मुंबई येथे कामाकरिता स्थलांतरित झाले.
मुंबईत आल्यानंतर त्यांनी वापरलेल्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपला व्यवसाय स्थापित केल्यानंतर त्यांनी 1927-28 मध्ये डेक्कन मोटार एजन्सीची सुरुवात केली. आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी त्यांनी 1933 मध्ये इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय कार व्यापारात आपला सहभाग नोंदविला. सदर भेटीदरम्यान त्यांना व्यवसायाबद्दलच्या अनेक चांगल्या कल्पना विकसित करण्याची संधी मिळाली.