रेडिमेड कपड्यांसाठीची पहिली गरज म्हणजे उत्तम कापड. कॉटनकिंग खुल्या बाजारातून कापड खरेदी करत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कापडासाठी ते वेगवेगळ्या कापड मिलसोबत करार करतात. उदाहरणार्थ – डेनिमच्या कापडासाठी ‘अरविंद मिल्स’, सुटिंगसाठी ‘वर्धमान’, एअरोसॉफ्ट कापडासाठी ‘डेन्व्हर’ यांच्यासोबत ‘कॉटनकिंग’चा करार आहे. विशिष्ट स्पेसिफिकेशन्स देऊन हवे तसे कापड बनवूनही घेतले जाते. विशिष्ट प्रकारचा धागा, विशिष्ट पोत, वीण, सरफेस फिनिशिंग अशा अनेकविध कॉम्बिनेशन्सच्या कापडांचा यात समावेश आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेली अचूकता हे ‘कॉटनकिंग’च्या यशाचे गमक आहे. ‘कॉटनकिंग’च्या बारामती येथील प्लांटमध्ये एकाच छताखाली सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कापड आल्यानंतर त्याच्या कटिंगपासून कपडे तयार होईपर्यंतच्या सगळ्या गोष्टी इथे एकाच छताखाली पार पाडल्या जातात. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेवर शंभर टक्केनियंत्रण राखता येते. अर्थातच त्यामुळे गुणवत्ताही कायम राखली जाते.
क्वालिटी चेक होऊन आलेल्या कापडावर ‘कॅड’द्वारे मार्कर प्लॅन बनवला जातो. तो स्प्रेडिंग आणि कटिंग मशीनमध्येफीड होतो. त्याआधारे एकावर एक ठेवलेल्या कापडाच्या थरांचे कटींग होते. कापडाचा फॅब्रिक विभाग नंतर कटिंग विभागातून हे कापलेले कापडाचे तुकडे प्रॉडक्शन फ्लोअरवर जातात. या कापडाच्या तुकड्यांपासून छोटे भाग, मोठे भाग बनवले जातात आणि हे सगळे पुढे असेंब्ली लाईनमध्ये जाते. इथे एका हँगरला एका कपड्याचे छोटे-छोटे पार्ट अडकवलेले असतात. हे हँगर पुढे पुढे सरकत जातात. ज्या कारागिराचे जे काम असेल ते, उदा. कॉलर लावणे, खिसा जोडणे वगैरे, ते पूर्ण करून तो पुन्हा त्या हँगरला जोडतो आणि हँगर पुढच्या सेक्शनकडे जातो आणि पुढचा कारागीर त्याची प्रक्रिया पूर्ण करतो.
या अत्याधुनिक मशीनमुळे कामाची गती वाढते. माणसाचा विचार केला तर सकाळी त्याचा कामाचा वेग चांगला असतो, दुपारी तो थोडा सुस्तावतो आणि संध्याकाळ होईपर्यंत त्याची एनर्जी पूर्ण संपत आलेली असते. पण मशीन दिवसभर एकाच गतीने काम करत असल्यामुळे ते च्यासोबत काम करणाऱ्या माणसालाही जागरूक राहून त्याच गतीन काम करायला लावते.
शिवून पूर्ण झाल्यावर प्रत्येक कपड्याचे इन्स्पेक्शन केले जाते. त्याची शिलाई, बटण, काज, कॉलर अशा प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची तपासणी केल्यानंतर तो कपडा पॅकिंग करून पुढे वेअर हाऊसला पाठवला जातो.