‘प्रविण मेहन्दी’ समूहाची शोरूम

प्रविण मेहन्द : अफाट कष्टातून गडद रंगलेली यशोगाथा

घरची जेमतेम आर्थिक स्थिती, तरुण वयातच धंद्यात झालेला विश्वासघात आणि त्यानंतर नोकरीत आलेले वैफल्य… एखादा मनुष्य या एकामागोमाग एक येणाऱ्या नैराश्याने पुरता खचून गेला असता. पण शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगलेल्या राजमल ओसवाल यांना १९७६ मध्ये मेंदीच्या रूपाने एक अतिशय वेगळी व्यवसाय संधी दिसली आणि त्यांनी त्या संधीचे अक्षरशः सोने के ले. आज ‘प्रविण मेहन्दी’, ‘प्रविण सुगंधी उटणे’ आणि ‘प्रविण नर्तकी हिना’ या आपल्या प्रमुख ब्रँडद्वारे ‘प्रविण’चे नाव महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचले आहे. राजमल ओसवाल यांचे चिरंजीव प्रमोद ओसवाल हे आता व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत,

तर त्यांची दोन्ही मुले प्रज्वल आणि पक्षाल हे आपल्या आवडीच्या क्षेत्रांत करिअर करीत आहेत. शुक्रवार पेठेतल्या सात बाय वीसच्या खोलीतून सुरू होऊन आज राज्यातील अग्रगण्य ब्रँड म्हणून नावारूपाला आलेल्या ‘प्रविण मेहन्दी’विषयी जाणून घेऊया खुद्द राजमल आणि प्रमोद ओसवाल यांच्याकडून.

‘नारियों की प्यारी प्रविण मेहन्दी’ हे वाक्य तुम्ही अनेकदा जाहिरातीत पाहिले असेल, वाचले असेल. मेंदी उत्पादनात अग्रसेर असणाऱ्या ‘प्रविण मेहन्दी’ कंपनीची ही प्रसिद्ध टॅगलाईन आहे. मेंदीच्या ब्रँडची निर्मिती करून गुणवत्तापूर्ण, अस्सल मेंदी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ओसवाल कुटुंबीय गेली ४५ वर्षे करीत आहेत. ओसवाल कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील. मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवर असलेल्या निमच गावातून राजमल ओसवाल यांचे वडील सुमारे ८० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पुण्यात आले. तेव्हापासून ओसवाल कुटुंब हे पक्के पुणेकर झाले. राजमल ओसवाल यांचा जन्मही पुण्यातच झाला. त्यांच्या वडलांनी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्यावर अत्तराचा व्यवसाय सुरू केला. पण हलाखीची परिस्थिती काही केल्या पिच्छा सोडत नव्हती, त्यामुळे राजमल यांनी आठवतीच शाळा सोडत छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. राजमल यांना पहिल्यापासून व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी १९६० च्या दशकात भागीदारीत डेक्कनला गिफ्ट आर्टिकलचे दुकान सुरू केले. बॉलिवुडमधले अनेक बडे सिनेस्टार तेव्हा त्यांच्या दुकानात यायचे. या धंद्यातून घरची परिस्थिती पालटेल, अशी आशा वाटत असतानाच चार वर्षांनी भागीदारीत बिनसल्यामुळे राजमल यांना आपल्याच दुकानातून कायमस्वरूपी बेदखल व्हावे लागले. त्यानंतरही हार न मानता त्यांनी तुळशीबागेत एका गिफ्ट आर्टिकलच्या दुकानात नोकरी सुरू केली. पण मूळची व्यवसाय करण्याची वृत्ती असल्याने नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे सात वर्षे तुळशीबागेत काम केल्यावर त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर ते मेंदीच्या व्यवसायात कसे आले यामागची गोष्ट मोठी सुरस आहे.

राजमल ओसवाल
राजमल ओसवाल
प्रमोद ओसवाल
प्रमोद ओसवाल
‘प्रविण मेहन्दी’चे दुकान

मेंदीत दिसली व्यवसाय संधी

राजमल ओसवाल सांगतात, “नोकरी सोडल्यानंतरचा काळ मोठा वैफल्याचा होता. पुन्हा कुठली नोकरी करावी की व्यवसाय करावा, काही कळत नव्हते. त्या दिवसांत मला रात्र-रात्र झोप यायची नाही. असाच एकदा मंडईजवळच्या नेहमीच्या कट्ट्यावर बसलो असताना नवल खिंवसरा या मित्राने विचारपूस केली. रात्री अडीचची वेळ होती. माझी हकीकत ऐकून तो म्हणाला, की मेंदीचा धंदा कर. तोवर मला मेंदीविषयी काहीच माहिती नव्हते. पण हा व्यवसाय एकदम वेगळा असल्याने ही कल्पना मला आवडली आणि अशा प्रकारे १९७६ साली मी हा नवीन व्यवसाय सुरू केला.”

ब्रँडेड मेंदी खेडोपाडी पोहोचविली

गणेश पेठेतून मेंदी आणायची आणि मंडई-तुळशीबागेत विकायची असा सुरुवातीला त्यांचा दिनक्रम असायचा. त्यानंतर त्यांनी जैन मंदिराजवळील काही दुकानांमध्ये मेंदी ठेवायला सुरुवात केली. पहिल्या पाच-सहा ऑर्डर्समध्ये ओसवाल यांना ८५ रुपयांचा नफा झाला आणि याच धंद्यात यापुढे नशीब आजमावून पाहायचे त्यांनी पक्के केले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचे प्रविणचे नाव आपल्या या नवीन व्यवसायाला दिले. ओसवाल यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांना १९७० च्या दशकातही जाहिरातींचे आणि ब्रँडिंगचे महत्त्व चांगले कळत होते. त्यामुळे व्यवसायात झालेल्या पहिल्या नफ्यातून त्यांनी ‘प्रविण मेहन्दी’चे नवीन कापडी फलक बनवून घेतले. ते ज्या दुकानांत मेंदी विकायला ठेवत होते त्या दुकानदारांना हे फलक लावण्याची विनंती केली. याचा चांगलाच फायदा झाला आणि ‘प्रविण मेहन्दीची मागणी ग्राहकांकडून दिवसागणिक वाढायला लागली. त्या काळी रुपयाला फार महत्त्व होते, त्यामुळे त्यांनी पाकिटात मेंदी भरून ते एक रुपयाला तुळशीबागेतल्यादुकानांतून ते विकायला सुरुवात केली. तसेच खेडोपाडी ‘प्रविण मेहन्दी’ पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी अगदी दहा पैशांच्या छोट्या पुड्या करून त्या विकायला सुरुवात केली.

जाहिरातीचे बी नेहमी उगवतेच!

व्यवसायातल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ओसवाल सांगतात, “त्या काळी मेंदी ही किराणा मालाच्या दुकानात सुट्टी मिळायची. तिला व्यवस्थित पॅकेजिंग करून दिसायला सुबक अशा छोट्या पुड्यांमध्ये भरून दुकानांतून विकायला मी सुरुवात केली. बाजारपेठेत ऑर्डरसाठी फिरताना मी नेहमी झब्बा-पायजम्यातच असायचो. मी कपडे साधे घातले, पण आमच्या ब्रँडची जाहिरात चांगली केली. जाहिरात ही शेतात बी टाकल्यासारखी असते. स्वतःच्या व्यवसायाची पूर्ण आत्मविश्वासाने जाहिरात केल्यास फायदा होतोच होतो.”

‘प्रविण मेहन्दी’ हा ब्रँड तयार झाला तसा पुण्याबाहेर व्यवसाय विस्तार करण्याची संधी ओसवाल यांना दिसायला लागली. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात दौंड, बारामती, इंदापूर, फलटण, सातारा अशा परिसराचा दौरा करीत त्यांनी मेंदीच्या ऑर्डर्स आणायला सुरुवात केली. संपूर्ण राज्यभर ‘प्रविण मेहन्दी’ पोहोचली पाहिजे, हा ध्यास घेतलेल्या ओसवाल यांनी आपले व्यवसाय दौरे सुरूच ठेवत कराड, कोल्हापूर, सांगली, मिरज, संगमनेर, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद अशी शहरे पालथी घातली. कार्टनमध्ये म्हणजेच मोठ्या बॉक्समध्ये मेंदी पॅकेट्स पॅक करीत ती बाजारात देण्याची पद्धतही ओसवाल यांनीच रूढ केली.

एका खोलीपासून फॅ क्टरीपर्यंतचा प्रवास

ओसवाल कुटुंब शुक्रवार पेठेतल्या ठाकूरदास वाड्यात वास्तव्यास होते. तिथल्या त्यांच्या घरातून म्हणजेच ७ बाय २० च्या एका खोलीतूनच व्यवसायाची सुरुवात झाली. व्यवसायाचा व्याप वाढला तसा ठाकूरदास वाड्यात प्रत्येक बिऱ्हाडात मेंदी भरायला द्यायला सुरुवात करण्यात आली. यामुळे त्या कुटुंबांनाही नवा रोजगार मिळाला. प्रमोद ओसवाल म्हणतात, “बाबा हे पुण्यासह बाहेरगावांतून मेंदीच्या ऑर्डर्स आणत असताना माझ्या आईने- निर्मलादेवी यांनी- पॅकेजिंग डिपार्टमेंट एकहाती सांभाळले. आमच्या व्यवसायाची सुरुवात शुक्रवार पेठेतल्या त्या एका खोलीतून झाली. त्यामुळे ती खोली आजही आम्ही जपली आहे.”

नवीन सुसज्ज प्रकल्पाची उभारणी

व्यवसायाचा व्याप वाढायला लागला, तशी ही जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळेच मग येरवड्यात छोटेखानी कंपनी सुरू करण्यात आली. येथेच पहिल्यांदा मेंदी पॅकेजिंगसाठी खास दिल्लीहून मशीन मागविण्यात आले. पण ‘प्रविण मेहन्दी’चे नाव आता राज्यातल्या घरोघरी पोहोचले होते. त्यामुळेच अल्पावधीतच येरवड्यातील जागाही कमी पडू लागली. त्यामुळे २००० साली उंड्री-पिसोळी येथे एक एकरच्या प्लॉटमध्ये सहा हजार स्क्वेअर फुटांच्या सुसज्ज जागेत नवीन फॅक्टरी उभारण्यात आली. या समारंभाला ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ॲडव्होकेट फत्तेचंद रांका, मोहनलाल जैन, सागरमल शहा, मुळजीभाई शहा, प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ उपस्थित होते. ‘प्रविण’च्या राज्यभरातील डिस्ट्रिब्युटर्सना खास आमंत्रित करण्यात आले होते. ‘प्रविण’च्या पुण्यातील या प्लॅंटमध्ये ५० कर्मचारी, तर राजस्थानच्या प्लँटमध्ये १०० कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत असून, ‘प्रविण’च्या परिवाराचे ते सदस्य आहेत.

मेंदीची शेती, प्रक्रिया आणि उत्पादन

मेंदीची काही शेती नसते, तर शेतात बाहेरची जनावरे घुसून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण म्हणून मेंदीची झाडे कुंपणावर लावली जातात. कारण मेंदीची पाने कडू असल्याने त्यांच्या वासाने अन् चवीने प्राणी लांब पळतात. पण व्यवसायवृद्धीमुळे मेंदीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने ‘प्रविण’तर्फे राजस्थानमध्ये खास मेंदीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. तिथे मेंदी प्रक्रिया आणि उत्पादनाचा प्रकल्प असून, राजस्थानमध्ये शंभर कर्मचारी आहेत. दिवाळीनंतर मेंदीची पाने काढून ती दळायला सुरुवात केली जाते. मेंदीची पाने दळून झाल्यावर तो कच्चा माल पुण्यात आणून पुढची प्रक्रिया आणि पॅकेजिंग पुण्यातील प्रकल्पामध्ये केले जाते. कोरडी मेंदी आणि कोन अशा दोन्ही प्रकारांत ‘प्रविण मेहन्दी’ उपलब्ध असते. शुद्ध मेंदी ही कधीच हिरवीगार नसते, तर तिला तपकिरी छटा असते. ती ओरिजिनल मेंदीची ओळख आहे, अशी टिपही प्रमोद ओसवाल ग्राहकांना आवर्जून सांगतात.

‘प्रविण उटणे’ आणि ग्राहकांची पावती

गेल्या जवळजवळ पंचवीस वर्षांपासून राजमल यांचे सुपुत्र प्रमोद ओसवाल हे व्यवसायाच्या विस्ताराची आणि सर्व उत्पादनांची धुरा सांभाळत आहेत. ‘प्रविण मेहन्दी’ला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत असतानाच उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने साधारण वीस वर्षांपूर्वी ‘प्रविण सुगंधी उटणे’ हे बाजारात आणण्यात आले. मेंदीप्रमाणेच उटण्यालाही ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. उटण्यासंदर्भातला एक किस्सा प्रमोद ओसवाल यांनी सांगितला. ते म्हणाले, की ‘प्रविण’ची उत्पादने खरोखर घरोघर पोहोचली आहेत का, याची चाचपणी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी दिवाळीदरम्यान मी मुंबईतल्या एका राजस्थानी मित्राला फोन केला. त्याला मी विनंती केली, की त्याच्या अपार्टमेंटमध्ये कोणी महाराष्ट्रीय कुटुंब असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्यांनी दिवाळीसाठी कोणते उटणे आणलेय हे विचारावे. त्यांनी तसे विचारताच त्या कुटुंबाने पटकन ‘प्रविण’च्या उटण्याचे नाव घेतले. ग्राहकांच्या पसंतीची ही मोठीच पावती त्या दिवशी आम्हाला मिळाली.’

‘प्रविण सुगंधी उटण्या’चं वैशिष्ट म्हणजे यातल्या आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांमुळे केवळ दिवाळीतच नाही, तर वर्षभर हे उटणे वापरणारे असंख्य ग्राहक आहेत. ‘प्रविण सुगंधी उटण्या’मुळे त्वचा कोरडी पडत नाही, फाटत नाही. उलट त्वचा निरोगी आणि सुंदर राहते. ‘प्रविण’च्या सुगंधी उटण्यात नागरमोथा, कपुरकचली, दौना, मरवा, तुळशी पावडर, हळद, संत्रा पावडर यांसारख्या अनेक आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती असतात. यापैकी काही वनौषधी या नदीकाठी उगवतात. बाकी उटण्यासाठी लागणारी हळद ही गुजरातहून आणि दौना, मरवा, कपूरकाचली ही दक्षिणेतील राज्यांतून, तर मुलतानी माती राजस्थानातून मागविली जाते. हे सर्व घटक पदार्थ एकत्रित करून त्यांचे पॅकेजिंग करण्याचे काम पुण्यातील फॅक्टरीत केले जाते.

‘प्रविण मेहन्दी’ आणि सुगंधी उटण्याबरोबरच ‘प्रविण नर्तकी हिना’ हे उत्पादनही आज प्रचंड लोकप्रिय आहे. केसांसाठी अत्यंत पोषक असलेल्या‘ प्रविण नर्तकी हिना’मध्ये आवळा, रिठा, जास्वंद, शिकेकाई, मेंदी यांसारखे अनेक उपयुक्त घटक आहेत. केस गळणे, केस पांढरे होणे, कोंडा यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांवर ‘प्रविण नर्तकी हिना’ अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळेच मेंदी आणि उटण्यासोबतच ‘प्रविण नर्तकी हिना’ हा आता नवीन ब्रँड तयार झालेला आहे. दिवाळीच्या दरम्यान ‘प्रविण’तर्फे आपल्या उत्पादनांचे विशेष कॉम्बो पॅक केले जाते. यामध्ये उटणे, बदामाचे तेल, दिवा, पणती, मेंदीचे कोन अशा वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा समावेश असतो.

या मुख्य उत्पादनांसोबतच आवळा पावडर, शिकेकाई, जास्वंद-रिठा पावडर, डांबरगोळी या ‘प्रविण’च्या अन्य उत्पादनांनाही नेहमीच मागणी असते. ‘प्रविण’चे डिस्ट्रिब्युटर्स आज राज्यभरात आहेत. त्यामुळे अगदी खेडोपाडीही ‘प्रविण’ची ही सगळी उत्पादने ग्राहकांना सहज मिळतात. याशिवाय आता प्रत्येक मॉलमध्ये आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवरही ‘प्रविण’ची उत्पादने उपलब्ध आहेत. ‘प्रविण’च्या आजवरच्या वाटचालीला व्यापार ‘भूषण पुरस्कार’, ‘व्यापार उद्यम गौरव पुरस्कार’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

बांधकाम व्यवसायात पदार्पण

शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज संकुल साकारण्याच्या उद्देशाने प्रमोद ओसवाल हे लवकरच बांधकाम व्यवसायात पदार्पण करीत आहेत. शुक्रवार आणि रविवार पेठ एकमेकांना मिळतात तिथे ‘प्रविण डेव्हलपर्स कमर्शियल कॉम्प्लेक्स’ ही ३०० दुकाने आणि ६० फ्लॅट्सची नवीन स्कीम लवकरच लाँच करण्यात येणार आहे. पुणे मेट्रो स्टेशन आणि पार्किंगची सुविधा जवळच असल्याने ग्राहकांना या संकुलात येणे अतिशय सोयीचे ठरणार आहे.

पुण्यातील उंड्री पिसोळी येथील ‘प्रवीण मेहन्दी समूहा’ची फॅक्टरी
श्री. ओसवाल यांचा संपूर्ण परिवार

चौथी पिढी आणि बिट बॉक्सिंग हटके क्षेत्र

ओसवाल कु टुंबाची चौथी पिढी म्हणजेच प्रमोद ओसवाल यांची दोन्ही मुले प्रज्वल आणि पक्षाल हे सध्या उच्च शिक्षण घेत आहेत. मोठा मुलगा प्रज्वल याने इंग्लंडमधील बर्मिंगहम येथून मास्टर्स इन आंत्रप्रिनरशिप हा अभ्यासक्रम पूर्ण के ला असून, तो सध्या तिथेच नोकरी करतोय. मायदेशी परतताना परदेशात कमावलेले ज्ञान आणि तिथे कष्टानं मिळविलेले भांडवल घेऊन तो लवकरच व्यवसायात येणार आहे.

पक्षाल हा बिट बॉक्सिंग या संगीताच्या अतिशय वेगळ्या क्षेत्रात आपले करिअर घडवीत आहे. त्याने साऊं ड इंजिनिअरिंगमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण के ला असून, संगीतातील पुढील शिक्षणासाठी ‘के पॉप’ची पंढरी असलेल्या दक्षिण कोरियात जायच्या तयारीत आहे. पक्षालला संगीताची आवड आहे. त्यामुळेच लहान वयातच पियानो आणि गिटार शिकल्यावर संगीतात आणखी वेगळे काय करता येईल यातून त्याने बिट बॉक्सिंग या आगळ्यावेगळ्या संगीत प्रकारात नाव कमावले आहे.

बिट बॉक्सिंग म्हणजे कोणत्याही सांगीतिक उपकरणांशिवाय स्वतःच्या आवाजासह शरीरातील वेगवेगळ्या कं पनांच्या साहाय्याने संगीताची निर्मिती करणे. पक्षालने घरातच स्वतःचा बिट बॉक्सिंगचा अद्ययावत साऊंड स्टुडिओ साकारला असून, एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या पुणे बिट बॉक्स चॅम्पियनशिपचा तो विजेता आहे. याशिवाय मुंबई, बेंगळुरु, दिल्ली, कोलकाता येथे पार पडलेल्या बिट बॉक्सिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये, इव्हेंट् समध्ये तो आजवर झळकला आहे. काही स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही त्याने जबाबदारी पार पाडली आहे. तो स्वतः बिट बॉक्सिंगचे ऑनलाईन क्लासेसही घेतो आणि आज पुण्या-मुंबईतच नाही, तर जगभरात त्याचे विद्यार्थी आहेत.

पक्षाल सध्या त्याच्या स्वतःच्या म्युझिक अल्बमवर काम करत असून, तो पुढील वर्षी रिलीज करण्याचे त्याचे नियोजन आहे. चित्रपटांबरोबरच गेमिंग, एन्टरटेनमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्येबिट बॉक्सिंगला मागणी असून, येत्या काळात ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पक्षालने यासोबतच डिजिटल मार्केटिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण के ला असून, या माध्यमातून आपल्या घरच्या व्यवसायालाही हातभार लावण्याची त्याची इच्छा आहे.

सर्व महाराष्ट्रात डिस्ट्रिब्टयुर्स, डीलर्स नेमणे तसेच फ्रँ चायझी देणे आहेत.
संपर्क : ९८२२१ ८७४७

English