शारीरिक व्याधींचे निदान आणि उपचार करणे सोपे असते, कारण त्याची लक्षणे दिसतात, त्रास जाणवतो. पण मनाचे आजार जसे सहज दिसत नाहीत, तसेच ते सहज स्वीकारलेही जात नाहीत. तरी गेल्या काही वर्षांमध्येविविध माध्यमांतून होत असलेल्या जागरूकतेचा परिणाम म्हणून लोक याबाबत साक्षर होऊ लागले आहेत. परिणामी मेंटल हेल्थ केअर आणि रिहॅब सेंटरमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांत वाढले आहे. अर्थात, ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज झाली आहे. अशी सेंटर्स म्हणजे मानसिक रुग्णांसाठी आधार केंद्र ठरत आहेत. ही वस्तुस्थिती सांगत आहेत पणु्यातील ‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’चे सर्वेसर्वा रॉनी जॉर्ज.
‘चैतन्य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ’ १९९९ पासून मनोरुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. रॉनी जॉर्जयांच्या कल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून ही संस्था आज मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधारस्तंभ बनली आहे. मनोरुग्णांना त्यांचे सामान्य आयुष्य परत मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी, समस्या येतात. त्यावर मात करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग, प्रयत्न करावे लागतात, याची प्रचिती ‘चैतन्य’मधील कार्यपद्धती बघितल्यानंतर जाणवते.