माने ग्रो ॲग्रो : शेती आणि पर्यावरणाशी नाळ जोडणारा उद्याेग समूह

उमेश माने यांचा प्रेरणादायी प्रवास । मशरूम उत्पादनात देशात विक्रमी कामगिरी । बायोमास ब्रिकेटिंगचा अभिनव प्रयोग

यशस्वी माणसे एका दिवसात तयार होत नाहीत. या यशस्वी कहाणीत प्रयत्न, परिश्रम, संघर्ष आणि त्यातून येणारी सफलता असते. त्यामागे धाडस, जोखीम, वेगळा विचार, वेगळा दृष्टिकोन असतो. हा सगळा चक्रव्यूह पार करीत स्वत:ला घडविणारी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. ‘माने ग्रो अग्रो’ या बहुचर्चित ब्रँडचे सर्वेसर्वा उमेश माने अशांपैकीच एक. एकाच वर्तुळात न अडकता सतत नावीन्याचा शोध घेत राहणे, ही उमेश माने यांची अनोखी खासियत. त्याचाच प्रत्यय देताना त्यांनी स्वतःच्या पन्नासाव्‍या वाढदिवशी ‘माने ग्रो अग्रो’ या नव्या कंपनीची पायाभरणी केली.

manegrow-agro-3

प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला घडविणे, सिद्ध करणे, हे खरेतर आव्हान असते. एरवी आपल्याला माणसाचे यश दिसते. यशस्वी माणसेही आपल्या अवतीभोवती दिसतात. त्यांच्या यशाचे, वाटचालीचे स्वाभाविकच आपल्याला कुतूहल असते. अर्थात, या यशाला अनेक पदर असतात. यशस्वी माणसे एका दिवसात तयार होत नाहीत. या यशस्वी कहाणीत प्रयत्न, परिश्रम, संघर्ष आणि त्यातून येणारी सफलता असते. त्यामागे धाडस, जोखीम, वेगळा विचार, वेगळा दृष्टिकोन असतो. हा सगळा चक्रव्यूह पार करीत स्वतःला घडविणारी माणसे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांचा प्रवास इतरांसाठी यशाची वाट दाखविणारा ठरतो. सामान्य परिस्थितीतून, शून्यातून, खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्ती तर समाजासाठी आणखीनच कौतुकास पात्र ठरतात. ‘माने अग्रो’ या बहुचर्चित ब्रँडचे सर्वेसर्वा उमेश माने त्यांपैकीच एक.

संघर्ष अन् मेहनतीतून झालेली त्यांची जडणघडण, त्यातून त्यांनी संपादन केलेले यश प्रशंसनीय आहे. अर्थात, त्यापलीकडे जाऊन त्यांचे विचार, दृष्टिकोन, कार्यशैली या बाबीही तितक्याच महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. खासकरून वेगळे काही करू पाहणाऱ्यांसाठी, नव्या पिढीसाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत.

उमेश माने हे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गावचे. घरची परिस्थिती अगदी सर्वसामान्य, बेताची असलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई, वडील अन् पाच भावंडांचे मिळून हे कुटुंब. भावंडांत ते सर्वात लहान. त्यांचे शिक्षण रहिमतपुरातील प्राथमिक शाळेत झाले. शालेय जीवनात असताना पुस्तकी हुशारीपेक्षा त्यांच्याकडे स्वतःचा स्मार्टनेस होता. बालपणापासून त्यांच्याकडे स्वतःचे असे निराळेपण होते. जिद्द होती अन् वेगळे विचार करण्याची दृष्टीही होती. त्यामुळेच अगदी दहावी-बारावीच्या वयातच आपण मोठे व्हायचे, काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचे, हे त्यांचे स्वप्न. अर्थात, केवळ स्वप्ने पाहून माणसाला मोठे होता येत नाही, त्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते, ही जाणीवदेखील त्यांच्या ठायी होती. त्यामुळेच केवळ ‘अभ्यास एके अभ्यास’ या परिघात न अडकता ते विविध उपक्रमांतही तितक्याच उत्साहान सहभागी होत. त्यामुळेच रहिमतपूरचे शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय असो, की साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय असो, त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. कॉलेजचा प्रतिनिधी म्हणूनही वेगळी छाप उमटविली होती. हे करताना अन्यायकारक धोरणांविरुद्ध आवाज उठविण्यातही ते नेहमीच आघाडीवर असत.

अनुभवांची शिदोरी

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. तेथे शिवाजीराव मोरे यांच्या शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेत काही काळ नोकरी केली. त्या निमित्ताने ठाणे, मुलुंड, वागळे इस्टेट परिसरातील जीवन त्यांना अगदी जवळून अनुभवावयास मिळाले. हरतऱ्हेची माणसे त्यांना भेटली. वैविध्यपूर्ण, वैचित्र्यपूर्ण प्रसंग टिपता आले. त्या काळात सायकलवरून झोपडपट्टीचा परिसर त्यांनी पालथा घातला. त्या सहा महिन्यांत त्यांनी स्वतःला समृद्ध केले. या कष्टाच्या, मेहनतीच्या दिवसांनी पुढे त्यांच्या आयुष्याला नवा आकार दिला, नवे वळण दिले. भविष्यातील वाटचालीसाठी अनुभवांची शिदोरी दिली. त्यानंतर त्यांनी पुण्याची वाट धरली. खराडवाडीच्या मोरेश्वर नागरी सहकारी बँकेत काही काळ काम पाहिले. तेव्हा ही बँक अडचणीत होती. आर्थिक स्थितीही डबघाईला आली होती. अशा स्थितीत त्यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. नवनव्या योजना सुरू केल्या. त्यांची अंमलबजावणी प्रभावी अन् परिणामकारकपणे केली.

यशाचे सूत्र

पुढे हणमंतराव गायकवाड या मित्राबरोबर त्यांनी ‘भारत विकास ग्रुप’मध्ये (बीव्हीजी) नव्या वाटचालीस सुरुवात केली. चांगले काम केले, तर त्याचे फळही निश्चितपणे चांगलेच मिळते, या वचनाला अनुसरून ते सतत कार्यमग्न राहिले. नेहरूनगर, चिखली, मुळशी ते अगदी धारवाड, सिंगूर, रुद्रपूर येथे उभारलेले यशस्वी प्रकल्प ही त्यांच्या कामावरील निष्ठेची फलश्रुती. ‘बीव्हीजी’तील कोणत्याही नव्या प्रकल्पाची संपूर्ण धुरा उमेश माने यांच्यावर असे. हाती घेतलेला प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या निश्चयाने उमेश माने कायम झपाटलेले असत. यामुळेच ‘बीव्हीजी’मध्ये त्यांना ‘मिशन मॅन’ या नावाने ओळखले जाते. निर्धार, निश्चय अन् निष्ठा असेल, तर माणूस यशस्वी होतो, हेच त्यांनी ‘बीव्हीजी’तील त्यांच्या कारकिर्दीदरम्यान दाखवून दिले.

पन्नाशीत नवी इनिग

एकाच वर्तुळात न अडकता सतत नावीन्याचा शोध घेत राहणे, ही उमेश माने यांची खासियत. समोर आव्हाने असल्याशिवाय मार्गतयार होत नाहीत, अशी त्यांची धारणा. त्याचाच प्रत्यय देताना त्यांनी स्वतःच्या पन्नासाव्‍या वाढदिवशी ‘माने ग्रो अग्रो’ या नव्या कंपनीची पायाभरणी केली. त्यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी होता. सुरुवातही शून्यातून होती. मात्र स्वतःच्या कर्तृत्वावरचा त्यांचा विश्वास अढळ होता.

शेतीशी नाळ जुळलेली

उमेश माने यांचा पिंड शेतकरी कुटुंबाचा. शेतीशी असणारी त्यांची नाळ कायमच घट्ट होती. त्यामुळे नव्या व्यवसायाची निवड करताना त्यांनी शेतीला अधिक प्राधान्य देण्याचे ठरविले. त्या दृष्टीने मशरूम (आळिंबी) व्यवसायावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. जेथे जेथे आळिंबी लागवडीविषयी उपयुक्त माहिती मिळेल, त्याचा शोध घेतला. खरेतर आळिंबी हे उत्तम प्रतीचे खाद्य. मात्र त्याचे उत्पादन अगदीच अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संपूर्ण देशभरात केवळ पाच कंपन्याच या क्षेत्रात कार्यरत असल्याचेही त्यांनी जाणले. त्यामुळेच अधिक भक्कमपणे या व्यवसायात उतरायला हवे, असेही त्यांनी पक्के केले.

‘माने ग्रो अग्रो इंडस्ट्रीज’ची स्थापना

उमेश माने हे कायम नवनव्या संकल्पनांचे पाईक. या स्वभावाला अनुसरूनच त्यांनी आपल्या नव्या प्रकल्पाकडे लक्ष वळविले. पवना धरण अन् राष्ट्रीय महामार्गयांच्या मधोमध असलेल्या नदीकाठी मशरूम कंपनीची जागा विक्रीसाठी निघाली असल्याची माहिती त्यांना मिळाली. सुरुवातीला ही जागा अन् तेथील इमारत त्यांनी भाड्याने मागितली. विस्तीर्ण शेतजमीन अन् इमारत यांची रक्कम ही आवाक्यापलीकडची. त्यात खिशात पुरेसे पैसे नसतानाही स्टेट बँकेकडून कर्ज उचलले. मित्रांची मदतही कामी आली. बंद असलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आठ महिन्यांत नव्या कामाची सुरुवात केली. दोन टनांवरून १५ टन प्रतिदिनाच्या घरात उत्पन्न पोहोचले. एका बाजूला उत्पादन अन् दुसऱ्या बाजूला क्षमतेत वाढ या पद्धतीने काम सुरू ठेवले. दररोज १५ टन उत्पादन घेण्याचा विक्रमही त्यांनी केला. या उत्पादनामुळे देशातील प्रमुख पाच कंपन्यांपेक्षा अधिक उत्पादनाचा विक्रम ‘माने ग्रो अग्रो’ने केला आहे. आता प्रतिदिन ३० टन उत्पादनाचे त्यांचे लक्ष्य आहे.

विक्री व्यवस्था

हा व्यवसाय उभा करण्याआधी त्याची विक्री व्यवस्था, तसेच बाजारातील मागणी या बाबतची सारी माहिती त्यांनी घेतली होती. अफाट मागणी असतानाही उत्पादन मात्र त्या तुलनेत कमी असल्याने मार्केट व्यवस्था उभी करण्यास त्यांना फारश्या अडचणी आल्या नाहीत. मोठ्या मॉल व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना उत्पादन देण्यास सुरुवात केली. स्वच्छ, ताजे अन् आकर्षक पॅकिंग असल्यामुळे मागणीही चांगली राहिली. सध्या उत्पादित मालापैकी ५० टक्के उत्पादन मॉलमध्ये जाते. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, विशाखापट्टणम इत्यादी शहरांत या उत्पादनाला मागणी असते. भारतात उगवलेले मशरूम्स परदेशात निर्यात करण्याचे ध्येयही उमेश माने यांनी ठेवले आहे.

यशाचे रहस्य…

आजही उमेश माने १६-१७ तास काम करतात. परिश्रम अन् प्रामाणिकपणा ही मूल्येही त्यांच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेत. सततच्या कष्टामुळे आपण सदैव उत्साही राहतो. कसलाही आजार, व्याधी माणसाजवळ फिरकतही नाही. अडचणी, समस्या तर सगळीकडेच असतात. मात्र प्रत्येक गोष्टीला मार्गही असतो. तो सापडेपर्यंत त्याचा शोध घेत राहणे अगत्याचे असल्याचेही ते आवर्जून सांगतात. जो विचार करतो, तो हमखास यशस्वी होतो, असेही ते नमूद करतात.

कुटुंबाचे भक्कम पाठबळ

उमेश यांच्या पत्नी सौ. मोहिनी यांचेही भक्कम पाठबळ ‘माने ग्रो अग्रो’ला लाभले आहे. व्यवसायाचा मोठा व्याप त्या कौशल्याने आणि नेटके पणाने सांभाळतात. संसार अन् व्यवसाय या दोन्ही आघाड्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली आहे.

उमेश माने यांची कन्या स्हल ने निष्णात टेनिसपटू असून, मुलगा संग्राम यूके तील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथे अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण घेत आहे. स्हलने वयाच् ने या आठव्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात के ली. वडिलांमुळे या खेळाकडे वळली असल्याचे ती सांगते. पुण्यातील पीवायसी हिंदूजिमखान्यात हेमंत बेंद्रे यांच्यामार्गदर्शनाखाली ती सराव करते.

जोधपूर खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंकिता रैनासोबत दुहेरीची अंतिम फेरी खेळणे ही स्हलच् ने या कारकिर्दीतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. मॉरिशस ओपन वर्ल्ड टूर सामन्यातील विजयामुळे जागतिक क्रमवारीत ती अव्वल २०० खेळांडूत पोहोचली आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे.

‘माने ग्रो अग्रो’ची वैशिष्टये’ :

दर्जेदार बियाणे
अचूक व्यवस्थापनातून २४ टक्क्यांपर्यंत इल्डची निर्मिती
सर्वमदर सीड्स हाँलडमधून
सीड्सची स्वत:कडील दोन लॅबमध् तपासणी
व्यवसायातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळून १,२०० लोकांना रोजगार
शेतकऱ्यांचाही सहभाग
भारतीय बाजारपेठे त अल्पावधीत स्वतंत्र ओळख
शिल्लक रॉ मटेरियलपासून कंपोस्ट खतनिर्मिती
विषमुक्त शेतीसाठी कं पोस्ट खतास मोठी मागणी

कॅन्ड बेबी कॉर्न
कॅन्‍ड स्वीट कॉर्न
कॅन्ड बटण मशरूम
कॅन्ड स्लाईस्ड मशरूम
फ्रोजन स्वीट कॉर्न
फ्रोजन ग्रीन पीज
फ्रेश ऑयस्टर मशरूम
फ्रेश बेबीकॉर्न

धडाडीचे उद्योजक उमेश माने यांनी स्थापन के लेल्या ‘माने ग्रो अग्रो’ची निर्यातक्षम उत्पादने. ग्राहकांना नावीन्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी कंपनी कायम प्रयत्नशील असते

बायोमास ब्रिकेट्स : कचऱ्यातून ऊर्जेकडे

उसाचे पाचट, भुसा, भुईमुगाची टरफले, फळांचे-भाज्यांचे देठ या एरवी वाया जाणाऱ्या किंवा शेतातच जाळल्या जाणाऱ्या घटकांपासून ऊर्जानिर्मिती करण्याच्या दिशेने ‘माने ग्रो अॅग्रो इंडस्ट्रीज’ने पाऊल टाकले असून, त्यासाठी सातारा, पुणे, अमरावती, अकोला व हैदराबाद येथे बायोमास ब्रिकेट्स उत्पादनाचे प्रकल्प उभारले आहेत.

इंधनाचा नवा पर्याय

ऊर्जा मिळविण्यासाठी आपण कोळसा, सरपण, केरोसिन यांसारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून असतो. कचऱ्यापासून तयार केले जाणारे ब्रिकेट्स अपारंपरिक इंधनात मोडतात. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी ‘माने ग्रो अग्रो’ कटिबद्घ आहे. आपल्या दैनंदिन ऊर्जावापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत आपण जसजसे जागरूक होऊ, तसतसे पारंपरिक ऊर्जास्रोतांकडून नव्या स्रोतांकडे जाण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल.

बहुआयामी बायोमास ब्रिकेटिग

बायोमास ब्रिकेटिंग म्हणजे सुट्या बायोमास सामग्रीवर प्रक्रिया करून घनरूप देणे. त्याद्वारे शेतीतील जळाऊ घटकांवर विशिष्ट दाब देऊन वेगवेगळ्या आकाराचे कॉम्पॅक्ट घन कंपोझिट तयार केले जाते. शेती उत्पादनातील अनेक दुय्यम उत्पादित घटकांचा इंधन म्हणून वापर केला जातो. परंतु ते पूर्ण कार्यक्षमतेने जाळले जात नाहीत. त्यापासून पुरेशी ऊर्जा पूर्ण क्षमतेने मिळत नाही. पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे कृषी अवशेष बायोमास ब्रिकेट्सच्या साहाय्याने कार्यक्षम हरित इंधनात रूपांतरित केले जाऊ शकतात.

सुट्या बायोमासच्या ब्रिकेट्स

वाहतूक, साठवण अन् हाताळणीच्या समस्यांव्यतिरिक्त पारंपरिक शेगडीमध्येसैल बायोमास थेट जाळणे ही कमी थर्मल कार्यक्षमता अन्व्यापक वायुप्रदूषणाशी संबंधित आहे. सुट्या बायोमासवर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर ब्रिकेट्स अथवा पॅलेट्समध्ये केले, तर ते अधिक कार्यक्षमतेने वापरले जाऊ शकतात.

कार्यक्षम ब्रिकेट्स

कृषी अवशेषांचे रूपांतर बायोमास ब्रिकेटमध्ये करून हे कार्यक्षम हरित इंधन वापरणे फायद्याचे ठरू शकते. बायोमास ब्रिकेट्स हे कोळशाला पर्यायी असे एक परिपूर्ण जैव-इंधन आहे. सुटे बायोमास थेट जाळताना त्यातून अत्यंत कमी ऊर्जा प्राप्त होते आणि वायुप्रदूषण जास्त होते. त्यामुळे सुट्या बायोमासवर प्रक्रिया करून त्यातून उच्च घनतेच्या ब्रिकेट्सची निर्मिती केल्यास त्यांचा कार्यक्षमतेने वापर केला जाऊ शकतो.

ब्रिकेट्स वापरण्याचे फायद

ब्रिकेट्सच्या वापरामुळे धूर, काजळी वा कार्बन निर्माण होत नाही. ते फ्लाय अशही तयार करीत नाहीत किंवा सल्फरसारखे विषारी घटकही उत्सर्जित करीत नाहीत. बायोमास कचऱ्याला ब्रिकेटमध्ये रूपांतरित केल्यामुळे त्याचे आकारमान दहा पटींनी कमी होते. त्यामुळे त्यांची साठवणूक, वाहतूक करणे सोपे होते. हाताळण्यास सोप्या अशा ब्रिकेट्समुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होते. वनस्पती अन् प्राण्यांच्या कचऱ्यापासून बनविल्या जाणाऱ्या ब्रिकेट्सची किंमत अन्य इंधनाच्या तुलनेत कमी होते. कमी आर्द्रता व जास्त घनता यामुळे ब्रिकेट्सवर चालणारे बॉयलर अधिक कार्यक्षमतेने काम करतात.

ब्रिकेट्सची मुख्य वैशिष्ट्ये

दंडगोलाकार ब्रिकेटचा वापर कोळशाला पर्याय म्हणून केला जातो. ब्रिकेट्स कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर उत्सर्जन कमी करण्यात मदत करतात. औद्योगिक बॉयलरमध्येब्रिकेट्सचा वापर केला जातो. अपारंपरिक वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकाचे इंधन म्हणूनही ब्रिकेट्सचा वापर होतो. बायोमास सुट्या स्वरूपात जाळण्यापेक्षा कॉम्प्रेशन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेल्या ब्रिकेट्स जास्त काळ जळतात. इतर इंधनांच्या तुलनेत ब्रिकेट्स अधिक तीव्र उष्णता निर्माण करू शकतात.

‘माने ग्रो अग्रो’चे ब्रिकेट प्रकल्प

‘माने ग्रो अग्रो कंपनी’ची उत्पादने अन् सेवेत सतत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ग्राहक, भागीदार, प्रतिनिधी आणि पुरवठादार यांच्याशी सातत्यपूर्ण, व्यावसायिक संवाद राहावा, यासाठी उमेश माने आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने कार्यरत असते. कंपनीचा ब्रिकेट प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटणपासून तीस किलोमीटर अंतरावरील बिबी गावात आहे. त्या ठिकाणी कच्च्या मालाची मुबलक उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत ठरणाऱ्या ब्रिकेट्सचे चार नवे प्रकल्प ‘माने ग्रो ॲग्रो’तर्फे नुकतेच सुरू करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील आळेफाट्यासह (ता. जुन्नर), अमरावती, अकोला व हैदराबाद येथे हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास

‘माने ग्रो अग्रो’ शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. फलटण येथील ब्रिकेट प्रकल्पात पाचट संकलन केंद्र स्थापण्यात आले आहे. येथे पाचट देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या आकारानुसार सेंद्रिय कंपोस्ट खत दिले जाते. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व बाजारापेक्षा चांगला दर देण्यासाठी त्यांच्याशी कायमस्वरूपी संपर्क, माहिती व ज्ञानाची देवाण-घेवाण, कृषी प्रक्रिया विकसित करण्याबाबतचे नियमित प्रशिक्षण, मॉडेल फार्म पद्धतींचा अभ्यास आणि अवलंब करण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. करार शेती उपक्रमांसह, ज्ञानाच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

English