(कै.) डॉ. चंपालालजी फुलचंदजी देसरडा यांनी १९७७ मध्ये डॉ. चंपालालजी देसरडा ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज उद्योग समुहाची स्थापना केली. आज या समूहाचे वटवृक्षात रूपांतर झाले. डॉ. चंपालालजी देसरडा यांचे शालेय शिक्षण पैठणला झाले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) मधून घेतले, तर पीएच.डी झेकोस्लोव्हाकियामधून पूर्ण केली. काही काळ एक-दोन कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर मराठवाड्याचे थोर सुपुत्र व स्वातंत्र्यसैनिक (कै.) अनंतरावजी भालेराव यांच्या प्रेणेने त्यांनी औरंगाबादला स्वत:च्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला एका छोट्याशा भाड्याच्या जागेत सुरू केलेल्या व्यवसायाचे रूपांतर आज मोठ्या उद्योगसमुहात झाले. आजमितीला त्यांच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत नऊ कंपन्या, एक अद्यावत व सुसज्ज असे कॉर्पोरेट कार्यालय, संपूर्ण देशात पाच ठिकाणी कार्यालये, ब्राझीलमध्ये एक मोठा कारखाना, पैठणमध्ये लवकरच सुरू होत असलेला पेपरपासून तयार करण्यात येणारा ‘टेबलवेअर’ असे व्यावसायिक प्रकल्प कार्यान्वित आहेत.
या व्यवसायाव्यतिरिक्त कृषी क्षेत्राचीही डॉ. चंपालालजी देसरडा यांना प्रचंड आवड होती. त्यांनी पैठण रोडवर सुमारे तीनशे एकरांवर शेतीचा भव्य प्रकल्प उभारला. यामध्ये दोन मोठी शेततळी उभारून त्याठिकाणी आंबा, चिकू, पपई, केळी, पेरू या व्यतिरिक्त गहू, ज्वारी, बाजरी ही पिके सेंद्रीय पध्दतीने घेतली जातात. उद्योगांचे बदलते प्रवाह ओळखून डॉ. देसरडा ग्रुपने जागतिक पातळीवर जे टिकू शकेल, अशा उद्योगांची निवड करीत ते यशस्वी केले आहेत.