‘सह्याद्री फार्म्स’ ब्रँडचा शेतमाल आजवर जगभरातील ४२हून अधिक देशांनी स्वीकारला आहे. युरोप आणि जपान या अन्नसुरक्षेच्या अत्यंत कठीण चाचण्या असलेल्या बाजारपेठा व सुपरमार्केट्समध्ये गेल्या ११ वर्षांत हा ब्रँड प्रस्थापित झाला. सह्याद्री फार्म्स ब्रँडची फळे, भाज्या व अन्य प्रक्रियायुक्त उत्पादने आता भारतीय बाजारपेठेत पहिल्या टप्प्यात नाशिक, मुंबई आणि पुणे या तीन शहरांतील कंपनीचे स्टोअर्स आणि ई-कॉमर्सच्या (ऑनलाइन) माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहेत. ३ लाख ‘व्हॅल्यूड कस्टमर्स’ जोडणे तसेच शेतमाल पुरवठा करणाऱ्या सध्याच्या ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची संख्या २५ हजारांवर नेणे, हे पहिले लक्ष्य आहे. करोना लॉकडाऊनच्या कठीण काळात सह्याद्री फार्म्सने मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये १ लाखांहून अधिक ग्राहकांपर्यंत दर्जेदार व निरोगी फळं आणि भाजीपाल्याच्या ६ लाखांहून अधिक बास्केट्स सुरक्षितपणे पोहोचवून स्वतःला सिद्ध केले.
सह्याद्री फार्म्सच्या स्थापनेमागे शेतकऱ्यांचेहित, ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी उत्पादनांचा पुरवठा याबरोबरच ग्रामीण व शहरी समाजातील दरी कमी करणे, ही मुख्य उदिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनाचा रास्त भाव तसेच ग्राहकाला सुरक्षित व आरोग्यदायी अन्न हा समतोल राखण्यासाठी कंपनीचा आजवरचा प्रवास अत्यंत यशस्वी आहे.